मोटार पार्किंगची लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू   

मुंबई : बोरिवली येथील लिंक रोडवरील ओम प्रथमेश इमारतीतील मोटार पार्किंगची लिफ्ट शनिवारी सकाळी अचानक कोसळली. या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू, तर अन्य एक मजूर जखमी झाला आहे.बोरिवलीतील ओम प्रथमेश या २१ मजली इमारतीमधील मोटार पार्किंगची लिफ्ट शनिवारी कोसळली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. लगेच त्यांनी बचावकार्य सुरू केले. कोसळलेल्या लिफ्टखाली अडकलेल्या दोघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून शुभम धुरीचा (वय ३०) मृत्यू झाल्याचे घोषित केले, तर सुजित यादव (वय ४५) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. सध्या मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी मोटार पार्किंगची लिफ्ट नेमकी कशी कोसळली? याबाबत चौकशी करीत आहेत.

Related Articles